top of page
Search
Writer's pictureParag Chitale

भेटू लवकरच


'धन आज दूल्हा, धन ये महूरत' सकाळी अश्विनीताईंच्या कुकुभ बिलावलनी घर उदंड झालं होतं. आई चहा करत असणार, मी डोळे किलकिले करत वेळेचा हिशोब केला. खूप नाही झाला उशीर उठायला, जरी रात्री बराच जागलो असलो तरीही, असा विचार मनात आला आणि हात तडक मोबाईलच्या शोधात उशीच्या डाव्या बाजूला गेला. स्क्रीनवर अनेक notifications दिसत होती. बाकी काही न बघता त्या एका Good morning ला उत्तर म्हणून एक गोड smiley पाठवून मी फोन उशीच्या शेजारी ठेवला आणि माझ्या नकळत एक मोठा निःश्वास एक हुरहुर मागे ठेवून निसटून गेला. डोळे पुन्हा क्षणभर बंद करून मी चेहऱ्यावरचं हसू मोजायचा व्यर्थ प्रयत्न केला. मी डोळे उघडले तेंव्हा एक शुभ्र लबाड कवडसा माझ्याकडे डोकावून बघत होता. खिडकीतून आत बघणारा तो प्रकाश-लोलक बहुदा त्याचा सवंगडी शोधत असावा. मी चादरीतून एक पाय बाहेर काढला आणि पडदा किंचित हलवला. त्याबरोबर तो दचकून दोन पावलं मागे सरकला. लपला कुठेतरी. पडदा पूर्वपदावर येईपर्यंत तो पण थांबला, मी पण थांबलो. दबक्या पावलाने येणारा त्याचा गोल चेहरा पुन्हा मला दिसला आणि मी त्याची खिल्ली उडवायला पडदा जरा अजून दूर केला. अचानक एकाचे दोन झाले! पळापळ झाली दोघांची. मी एका हातानी खिडकी जरा उघडली आणि भिंतीवर त्यांचा पकडापकडीचा हा खेळ बघत मी पाच मिनिटं पडून राहिलो. आज काही घाई नव्हती. जगात सगळं उत्तम चाललं होतं असं नाही म्हणता येणार पण किमान मला स्वतःला खूप हलकं वाटत होतं. आजच्या नंतर येणारे सगळे दिवस असेच चेहर्‍यावर मंद स्मित ठेवून तरंगायचे दिवस असणार होते असं वाटत होतं. मी पटकन कुशीवर वळून उशीला मिठी मारून डोळे एकदा गच्च बंद केले. उघडले. सगळं होतं तसं होतं. माझ्याकडे बघून कवडसे हसले, मला देखील रहावलं नाही मग. स्वप्न नसल्याची खात्री झाली.


नवीन मेसेज. 'अरे आळशी मुला, उठ की!' मी आळस देऊन उठून बसलो. रोज सकाळी मी असाच स्वच्छ जागा होत होतो. दिवसभर साद-प्रतिसाद आणि smileys चा अविरत वर्षाव ह्यात खंड नव्हता. घरच्या सगळ्यांच्या ‘दिवसभर फोन वर असतोस आणि पुन्हा रात्री किती उशीरापर्यंत जागा असतोस रे!?’ ह्या उपहासात्मक प्रश्नाला न जुमानता आमचा शब्दव्यवहार अहोरात्र चालू होता. रात्री पाणी प्यायला उठल्यावर आई-आज्जी एकदा दोनदा खोलीच्या दारावर टकटक करून जात तेंव्हा ‘झोपतोच आहे दोन मिनिटात’ म्हणून विडिओ कॉल सुरु राही. घरी कोणाला कळू न देता गप्पा मारायच्या म्हटल्यावर असं हे सगळं ओघाने आलंच. आणि लपाछपी खेळताना थोडी धावपळ झाली तरच मजा येते. इथे घरच्या घरीच लपाछपी होती तशी, बाहेर धावपळ करायला पोलिसांची परवानगी लागत होती. लॅपटॉप आणि फोनचा स्क्रीन हीच भेटीची ठिकाणं झाली होती. भेळेच्या गाड्या आणि हॉटेल्स आता ओस पडली होती. खूप गोष्टी बदलल्या होत्या. बाहेर जगात आणि इथे माझ्या आयुष्यात. Lockdown सुरू असताना हे असं काही होईल याचा विचारच केला नव्हता मी. कोण कुठला हा मुलगा, एकदम सगळं बदलून गेला. खरं सांगायचं तर कोण कुठला नाही म्हणता येणार, आम्ही दोघंही एकमेकांना खूप लहानपणापासून माहिती होतो तसे. पण ओळख असणं आणि ओळख पटणं यातला फरक इतक्यात लक्षात आला. आम्ही आधी कधी एकमेकांशी फार बोललो नव्हतो. इच्छा होती कदाचित पण कधी वेळ आली नव्हती. तो चांगला दिसतो, टेनिस खेळतो, डबडा ऐसपैस खेळताना पटकन आउट होतो, इंग्लिश मीडियम शाळेत होता आणि मग आर्ट्स करून आता सायकॉलॉजी मध्ये पीएचडी करतोय ही माहिती सगळ्यांना होती. मला सुद्धा. पण गेल्या काही महिन्यात काही ह्याहून जास्त महत्त्वाच्या आणि काही अतिशय निरुपयोगी उपयुक्त माहितीचा खजिना मला मिळाला होता. समक्ष त्याच्याकडून. सोशल मीडियाच्या युगात, ऑनलाईन स्टॉक करून सुद्धा न सापडणाऱ्या गोष्टी खास असतात. त्याला सुद्धा गाण्याची प्रचंड आवड आहे, त्याला मसाला डोसा खाताना भाजी बाजूला आवडते (कारण मग डोसा स्वच्छ राहतो म्हणे), त्याला सगळी नक्षत्रं तोंडपाठ आहेत, त्याला अजूनसुद्धा नीट सायकल चालवता येत नाही आणि तो सकाळी उठल्यावर न चुकता Good morning चा मेसेज करतो या गोष्टी रात्री 2-3 पर्यंत चालणार्‍या कॉल्स नंतरच कळतात. नवीन नातं हे internet explorer वर website पाहण्यासारखं असतं नाही? तुम्ही दोघं शंभर वेळा विचार करता, मनात पक्कं करता, आणि मग एक click करता. त्यापुढे काय, कधी होईल ते अतिशय आशेनी आणि संयमानी अनुभवणं हा महत्त्वाचा, छळवादी आणि तितकाच मजेचा प्रवास असतो. दोघांनाही एकेक नवीन गोष्टी कळतात, काही चांगल्या, काही नाही आणि तुम्ही तुमच्या खुदूखुदू हसणार्‍या मनाला शांत करत, जे सगळं आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करता. मला long-distance relationship बद्दल नेहमीच खूप प्रश्न असायचे. कसा राहणार contact, कसा राहणार connect, कंटाळा नाही का येणार सतत फोनवर असायचा, चिडचिड नाही का होणार सारखी, इत्यादि इत्यादि. पण आता सगळं बदललं होतं. माझ्या शेजारच्या सोसायटी मध्ये एक बिल्डींग सोडून राहणारा तो माझ्या screen वर दिवसरात्र होता आणि त्याला फक्त एकदा भेटलेला मी अजूनही स्वतःला चिमटे काढून दमलो नव्हतो.


आळस देत उजव्या हातावर किरण झेलत मी मान तिरकी करून कॅलेंडर पाहिलं. उनाड सूर्यानी फोकस टाकून सांगितलं की पाच महिने आणि 16 दिवस झालेत lockdown मध्ये. म्हणजे तेवढेच दिवस त्याला भेटून. पहिल्या Lockdown ची announcement झाली तेंव्हा आईनी मला तडक दूध आणायला पाठवताना बाकी लिस्ट whatsapp करते सांगून हातात एक पिशवी आणि जुना एक मास्क ठेवला होता. एका तंद्रीतच काय काय होईल याचा विचार करत मी जवळच्या दुकानात पोचलो. तिथे आधीच मोठी रांग लागली होती. सगळ्यांनाच गरजेच्या गोष्टी पाहिजे होत्या. माझ्या मागे एकामागून एक लोक येत होते. एकदम वाटलं की मागे ओळखीचा चेहरा आहे. पाहिलं तर 'तो' येऊन उभा राहिला होता. मी दोनदा मागे वळून पाहिलं खात्री करून घ्यायला. तो खरंच होता माझ्यामागे. मी पटकन शर्ट थोडा नीट केला होता. आज ते आठवून मला मजा वाटली. मला कल्पना नव्हती की मला मी त्याच्यासमोर चांगलं दिसायची तेंव्हा इतकी गरज वाटत होती. आणि Specially तेंव्हा, तिथे, त्या प्रसंगात. त्याला सुद्धा घरून घाईघाईत पाठवलं असणार, तो gym shorts मध्येच आला होता. त्याला मी त्याच्या आजोबांबरोबर जातायेता पाहिलं होतं काही वेळा. एखाद-दुसरं Smile इकडे तिकडे. ह्या आजारात त्यांची जास्त काळजी घ्यायला पाहिजे असं पटकन मानत येऊन गेलं. मी बोलू-नको बोलू असा विचार करत होतो. थोडा धीर करणार तेवढ्यात माझ्या खांद्यावर मला त्याची हलकी थाप जाणवली, 'hi, आपलं कधी इतकं बोलणं झालं नाही पण मी तुला तुझ्या आज्जी बरोबर पाहिलं आहे एकदा दोनदा, इथेच असते तुमच्याकडे?' मी 'हो, इथेच असते.' म्हणालो. त्याला माहिती होतं माझ्याबद्दल! माझी धडधड वाढली. 'काळजी घ्या तुम्ही सगळे. हे कधीपर्यंत चालेल देव जाणे.' त्याला काळजी आहे. हा शहाणा मुलगा आहे. चटकन दोन मार्क जास्त मिळाले त्याला. 'हो ना, मी आत्ता तुला just तुझ्या आजोबांबद्दल विचारणार होतो. बरे आहेत?' मी विचारून टाकलं. तो गोड हसला. 'आहेत बरे आता. मध्ये जरा नव्हतं ठीक पण आता आहेत मस्त.' तेवढ्यात माझा फोन वाजला. 'एक मिनिट हं, आईनी list पाठवली असणार. एकच मिनीट.' मी फोन पाहिला आणि silent वर टाकून पुन्हा त्याच्याशी बोलायला लागलो. माझा नंबर येई पर्यंत आम्ही पुढची पंधरा मिनिटं अतिशय उगाच विषयांवर गप्पा मारल्या. आम्ही इतके दिवस कधी कसे भेटलोच नाही, त्याचं टेनिस बंद होऊन वर्षं झालं, माझ्या सोसायटी मध्ये कसे कोणीच माझ्या वयाचे लोक उरले नाहियेत, माझं work from home कसं असणार आहे, त्याच्या थीसिस च्या timetable ची गडबड वगैरे वगैरे. त्या अतिशय अनपेक्षित परिस्थितीत, जीवनोपयोगी गोष्टी शोधत आलेले, आयुष्यात एकदाही एवढा वेळ न भेटलेले आम्ही दोघं, वर्षानुवर्ष एकमेकांचे जीवश्च-कंठश्च असल्यासारखे एकमेकाकडे आमचं मन मोकळं करत होतो. काहीतरी नवं घडत होतं. गोड, आवडेल असं, आणि नवं. हळूहळू पुढे पुढे सरकत आम्ही दुकानाच्या दारापर्यंत पोचलो. मी आत जाऊन दूध आणि आईनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि एकदम लक्षात आलं की मी गडबडीत निघताना पाकीट विसरून गेलो होतो! नेहमी paytm आणि Gpay घेणारा दुकानदार आज फक्त कॅश म्हणुन नेमका अडून बसला. 'तो' दुकानाच्या दाराशी उभा राहून हे पाहत होता. त्यानी माझी गोंधळलेली नजर पाहून विचारलं, 'All okay?' मी शरमिंदा होऊन त्याला सांगितलं की मी पाकीट विसरलो. 'एवढंच ना, मी देतो आत्ता. तू मला Gpay कर. किती झालेत?' मला खूप आश्चर्य वाटलं. आम्ही मित्र नव्हतो, कोणीच नव्हतो, एकमेकांच्या आयुष्यात पंधरा मिनिटांपूर्वी फक्त एक धूसर आकार होतो कदाचित. आणि आत्ता अचानक तो मला आपणहून मदत करायला पुढे आला होता. मला खरेदी न करता घरी जाता येणार नव्हतं, मी त्याला विचारलं,'तुला खरंच जमणार आहे ना? नाहीतर मी पुन्हा येऊ शकतो, काही हरकत नाही' हसतच तो पुढे आला, 'वेडा आहेस का? एवढं काय त्यात! काका किती झाले ह्याचे? मी माझ्या बिल बरोबर देतो'. मी माझी पिशवी घेऊन बाहेर त्याची वाट पाहत उभा राहिलो. मला खूप छान पण चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं. तो त्याची भरलेली पिशवी घेऊन आला आणि माझ्याशेजारी उभा राहिला. मी त्याचा नंबर घेतला आणि त्याला लगेच पैसे ट्रान्सफर केले. त्याला सतराव्यांदा Thank you म्हटल्यावर तो खदाखदा हसत सुटला.' अरे ठीक आहे, एवढं काय? पुढच्या वेळेला मी विसरून येईन पाकीट आणि मग तू दे पैसे. चालेल!?' मी पण हसलो. जरा बरं वाटलं. आम्ही एकत्र चालत परत निघालो. त्याच्या सोसायटीचं गेट माझ्या आधी येतं. दोघंही एकमेकांकडे चोरून कटाक्ष टाकत आणि एकही शब्द न उच्चारता चालत होतो. तुम्हाला धाडकन कोणीतरी येऊन 'तू हे शोधत होतास, घे' असं म्हटल्यावर जसं गडबडून जायला होईल तसं झालं होतं माझं. आणि मला माहिती सुद्धा नव्हतं की मी काहीतरी शोधत होतो पण तेंव्हा क्षणात जाणवलं होतं की कदाचित गरज होती मला. मोठे श्वास आणि भुरटं हसू आमचा पाठलाग करत होते. गेट पर्यंत पोचल्यावर आम्ही थांबलो. माझ्याकडे वळून तो म्हणाला, 'अं ऐक ना, हा lockdown संपला की आपण अजून भेटूयात? मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. I know खूप unexpected चाललंय हे सगळंच. पण what do you think?' मी किंचित थरथरत्या हातानी त्याचा हात धरला आणि म्हणालो 'Done. ज्या क्षणी आपल्याला बाहेर जाता येईल, त्या क्षणी आपण भेटलो.' माझ्या हातावर हात ठेवून तो पुन्हा गोड हसला. 'भेटू लवकरच.' गेट मधून आत जाताना त्यानी एकदा पुन्हा वळून पाहिलेलं मी पण पाहिलं आणि माझा उजवा हात तसाच रिकामा ठेवून मी घरी आलो. आईनी सांगितल्यावर त्यादिवशी मी खूप नाखुशीनी हात धुतले होते.


अश्विनीताई आता 'सब मिल गाओ, आनंद मनाओ' पर्यंत पोचल्या होत्या. माझ्या खोलीत कवडसे अजूनही एक फूटभर अंतर राखून होते. वाऱ्याबरोबर थरथरत होते. मी उठलो, पडदा पूर्ण उघडला. सगळी भिंत उजेडानी भरून गेली. ते दोन कवडसे आता दूर होते का नव्हते कळायला मार्गच नव्हता.


34 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page